औरंगाबाद- बँकांच्या विलीनीकरणाला विरोध करीत देशभरातील बँकांच्या संघटनांनी आज बंद पुकारला आहे. त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया सह इतर शाखांचे तब्बल सातशे बँक अधिकारी संपावर गेल्याने बँकांचे कामकाज ठप्प झाले आहे. केंद्र सरकारने बँक ऑफ बडोदा, देना बँक आणी विजया बँक या तीन बँकांच्या विलानीकरणाची घोषणा केली आहे. सरकारच्या या निर्णयाला देशभरातील ९ बँक संघटनांनी विरोध केला आहे.
विलानीकरणाचा यापूर्वीचा अनुभव फारसा चांगला नाही असे दिसून आले आहे. विलानीकरणाने बँकेच्या छोट्या शाखा बंद होतात. बँक ऑफ हैद्राबाद च्या विलानीकरणानंतर एसबीआय च्या अनेक शाखा बंद झाल्या आहेत. या तीन बँकांच्या विलानीकरणानंतर पुन्हा अनेक बँक शाखा बंद होण्याची भीती व्यक्त होत आहे. सरकारच्या निर्णया विरोधात बँक अधिकारी असोसिएशन एकवटली असून आज एकदिवसीय संप पुकारल्याचे बँक अधिकारी संघटनेचे देविदास तुळजापूरकर यांनी सांगितले.
७०० अधिकारी संपात
बँक अधिकारी संघटनेने पुकारलेल्या या संपात जिल्ह्यातील प्रमुख एसबीआय सह इतर ९ बँका सहभागी झाल्या आहेत. तर तब्बल ७०० हून अधिक बँक अधिकारी संपात सहभागी आहेत. परिणामी एसबीआय, पंजाब नॅशनल बँक सह इतर अनेक बँकांचे कामकाज ठप्प झाले आहे.
ग्राहक हैराण...
दरम्यान बँकांच्या संपाबाबत सर्वसामान्यांना फारशी माहिती नव्हती. त्यामुळे ग्राहक बँकेत चकरा मारताना दिसून आले. आजच्या संपानंतर उद्या आणी परवा बँकांना सुटी आहे. त्यामुळे आता सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. या संपाने ग्राहकांचे मात्र चांगलेच हाल झाले आहेत.